भुसावळ
शहरातील अमृत टप्पा २ अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात गंभीर त्रुटी आढळून आल्याच्या तक्रारीनंतर भुसावळ नगरपालिकेने ठेकेदाराला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
तक्रारीत संबंधित ठेकेदाराकडून पाईपलाईन टाकताना खोदकामातील संपूर्ण माती रस्त्यावर टाकली जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती होत असून, काम करताना निविदेतील अटी व शर्तींचा भंग केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी तात्काळ दखल घेतली. जा.क्र. भुनपा/अमृत/64/2025-26 दि. १ जानेवारी २०२६ रोजी यांत्रिकी पर्यावरण अमृत विभागाचे नगर अभियंता दीपक चौधरी यांच्या स्वाक्षरीचे व मुख्याधिकारी यांच्या मान्यतेचे पत्र संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहे.
या पत्रात सुरक्षिततेसाठी बॅरिकेटिंग करणे, खोदकाम व मातीचे योग्य व्यवस्थापन, पाईपलाईन टाकल्यानंतर गळती तपासणे, रस्ते पूर्ववत करणे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर बाबींवर ठेकेदाराने २४ तासांच्या आत योग्य ती कार्यवाही करावी व भविष्यातही याची दक्षता घ्यावी, अन्यथा निविदेतील क्लॉज क्रमांक ३ व ४ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

