केंद्र सरकारने देशातील VIPव्यक्तींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोऐवजी आत्ता VIPव्यक्तींच्या सुरक्षतेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांकडे असेल. पुढील महिन्यापासून हा आदेश लागू होणार आहे. एनएसजी कमांडोचा वापर आता केवळ दहशतवादविरोधी कारवायांसाठी केला जाईल.
देशात सध्या 9 व्हीआयपींना झेड-प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो तैनात आहेत. आता त्यांच्या जागी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. संसदेच्या सुरक्षेपासून मुक्त झालेल्या सीआरपीएफ जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन व्हीआयपी सुरक्षा शाखेत पाठवण्यात येणार असून यासाठी नवीन बटालियनही तयार करण्यात आली आहे.