भुसावळ : प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री शहरी आवास योजना (घरकुल) संदर्भातील बैठकीतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा न लावल्याने भुसावळात राजकीय वाद पेटला आहे. नगरपरिषदेच्या वतीने आयोजित बैठकीत शासनाच्या सर्वोच्च नेतृत्वाची प्रतिमा डावलल्याचा आरोप करीत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री शहरी आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी अनुदान देण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन योजनेसाठी नियुक्त सर्वेक्षण संस्थेच्या अध्यक्षा अंकिता लोखंडे यांनी केले होते. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा न लावण्यात आल्याने भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भुसावळ शहरातील ७/१२ सिटी सर्व्हेतील तसेच झोपडपट्टीधारक पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरबांधणीसाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, हजारो गरजू कुटुंबांच्या डोक्यावर छत देणारी केंद्र–राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अशा योजनेच्या बैठकीत शासनाचे नेतृत्व मुद्दाम डावलले जात असल्याचा आरोप करत भाजपने या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
यापुढे घरकुल योजना राबविताना आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक बैठकीत, शिबिरात व जनजागृती कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा अनिवार्यपणे लावाव्यात, अशी स्पष्ट मागणी युवराज लोणारी यांनी केली आहे. तसेच या संदर्भात कोणतीही हलगर्जीपणा अथवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणाचा जोरदार उल्लेख वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, उपगटनेते परीक्षित बऱ्हाटे, सभापती अनिता सपकाळे, नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, शोभा इंगळे, सीमा नरवाडे यांच्यासह माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, ॲड. बोधराज चौधरी, कैलास पाटील तसेच भाजपचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे उपस्थित होते.
भाजप नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करताना राजकीय आकस किंवा दुजाभाव सहन केला जाणार नाही. लाभार्थ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमध्ये नेतृत्वाचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, ती जबाबदारी पाळली नाही तर भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा आक्रमक इशाराही यावेळी देण्यात आला.

