भुसावळ
भुसावळ शहराच्या जीवनवाहिनीशी थेट निगडित असलेल्या अमृत योजनेतील पाणी टाकीचे काम सुरू असतानाच अचानक तोंडी आदेशाने थांबवण्यात आल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेला हा महत्त्वाचा पाणीपुरवठा प्रकल्प कोणतेही ठोस कारण न देता बंद ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा धोका स्पष्ट दिसत असतानाही प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप गटनेते युवराज लोणारी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ५ जानेवारी) भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी थेट नगरपालिका वॉटर सप्लाय कार्यालयावर धडक देत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना घेराव घातला. “काम का थांबवले? आदेश कोणी दिले? विलंबामागचा हेतू काय? आणि या गलथानपणाची जबाबदारी कोण घेणार?” असे थेट, धारदार सवाल करत नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.
यावेळी भाजप गटनेते युवराज लोणारी यांच्यासह पिंटू कोठारी, किरण कोलते, गिरीश महाजन यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. “अमृत योजना ही केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे शहरातील प्रत्येक घराला नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा हा ऐच्छिक नव्हे तर मूलभूत हक्क आहे, याची आठवणही नगरसेवकांनी प्रशासनाला करून दिली.
घेरावाच्या वेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दीपक चौधरी व सहाय्यक अभियंता अमित कोलते उपस्थित होते. नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी दोन दिवसांत कामाबाबत संपूर्ण माहिती देऊन स्पष्ट निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले. तांत्रिक अडचणी दूर करून पाणी टाकीचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांत ठोस व समाधानकारक निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकल्पाबाबत प्रशासनाने गांभीर्य दाखवावे, अन्यथा जनतेचा रोष उफाळून येईल, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या आंदोलनात भाजप उपगटनेते परिक्षीत बऱ्हाटे यांच्यासह पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, किरण कोलते, विशाल नाटकर, निक्की बत्रा, आशिष पटेल, सुजित भोळे, पूजा तायडे, सोनी बारसे, अर्चना सातदिवे, सीमा नरवाडे, ॲड. बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, मुकेश पाटील, सतीश सपकाळे, बापू महाजन, राजेंद्र नाटकर, देवा वाणी, अजय नागराणी आदी भाजप पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

