Tuesday, March 3, 2026
Homeभुसावळभुसावळ स्मशानभूमीत अस्थींचा गोंधळ; अस्थि चोरीच्या संशयाने नातेवाईक पोलीस ठाण्यात

भुसावळ स्मशानभूमीत अस्थींचा गोंधळ; अस्थि चोरीच्या संशयाने नातेवाईक पोलीस ठाण्यात

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील तापी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत मृतांच्या अस्थींवरून गोंधळ उडाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्वेश्वर नगर, मंगल शारदा कॉलनीजवळील रिंग रोड परिसरातील एका वृद्ध महिलेच्या २५ तारखेला झालेल्या अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी ‘सारी सावट’ करण्यासाठी नातेवाईक गेले असता अस्थी मिळून न आल्याने खळबळ उडाली. अस्थि चोरीचा संशय बळावल्याने नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.

मात्र चौकशीत वस्तुस्थिती समोर आल्यानंतर वेगळाच धक्का बसला. ज्या ठिकाणी वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्याच्या शेजारीच एका वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार झाले होते. संबंधित वृद्ध व्यक्तीचा मुलगा अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हता. उशिरा पोहोचल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार नेमके कुठल्या जागी झाले याची माहिती त्याला मिळाली नाही. परिणामी, वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरील अस्थी आपल्या वडिलांच्या समजून त्याने अस्थि संचय करून तापी नदीत विसर्जन केले. यामुळेच संपूर्ण गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकारानंतर वृद्ध महिलेच्या अस्थी चुकून विसर्जित झाल्याने संबंधित तरुणाने मृत महिलेच्या कुटुंबीयांची माफी मागितली. मात्र स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणतेही नियोजन, ओळखचिन्हे किंवा नोंद नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या घटनेने स्मशानभूमीतील व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अंत्यसंस्काराच्या प्रत्येक ठिकाणाला क्रमांक देण्यात यावा तसेच मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांची लेखी नोंद ठेवण्यात यावी, अशी ठोस मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अशा उपाययोजना केल्यास भविष्यात अशा प्रकारचे दुर्दैवी गोंधळ टाळता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या