भुसावळ
मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सुरक्षित, सुरळीत व अखंडित रेल्वे वाहतूक सुनिश्चित करणेसाठी २७ नोव्हेंबर रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ शाखा अधिकाऱ्यांसह मनमाड–भुसावळ सेक्शनचे विंडो ट्रेलिंग निरीक्षण करून रेल्वे पायाभूत सुविधांचा सर्वंकष आढावा घेतला.
ट्रॅक, पूल व सिग्नलिंगचे निरीक्षण
मनमाड–भुसावळ या महत्त्वपूर्ण रेल्वेखंडातील ट्रॅकची स्थिती, पुलांची रचना, सिग्नलिंग व्यवस्था आणि स्थानकांवरील सुविधा यांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
आरएच गिर्डर आणि टर्नआउट पॉईंट तपासणी
किमी २४९/१० येथील आरएच गिर्डर आणि टर्नआउट पॉईंट १०१ बी चे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले. सुरक्षा मानकांची अंमलबजावणी आणि वाहतुकीची सलगता कायम राहील यावर विशेष भर देण्यात आला.
हिरापूर स्टेशनवर डीआरएम यांनी ट्रॅक मेंटेनरशी संवाद साधला. पिंपरखेड येथील सब-ट्रॅक्शन स्टेशनची देखील तपासणी केली.
हिसवल स्टेशन भेट
हिसवल स्टेशनवर स्टेशन मास्टर ऑफिस, रिले रूम आणि आयपीएस रूमची पाहणी करण्यात आली. विभागीय व्यवस्थापकांनी कार्यक्षमता, सुरक्षा आणि विश्वसनीयता दृढ करण्यावर भर दिला.
नांदगाव क्रू लॉबी व लोको रनिंग रूम तपासणी
नांदगाव येथे क्रू लॉबी आणि लोको रनिंग रूमचे निरीक्षण करून रनिंग कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, स्वच्छता, विश्रांतीगृहे यांची पाहणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना स्वच्छ, सुसज्ज आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पाचोरा–गाळण दरम्यान एलएचएस १२९ तपासणी
किमी ३६७/३१ येथे पाचोरा–गाळण दरम्यान असलेल्या एलएचएस १२९ चे निरीक्षण करण्यात आले. पाचोरा स्टेशनवरील ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

