भुसावळ : प्रतिनिधी
नगरपालिकेत सत्तांतरण झाल्यानंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झालेल्या या सभेत ‘लाडका नगरसेवक योजना’ सुरू केल्याचा आरोप झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाले. अखेरीस सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील तब्बल २५० विषयांना मंजुरी दिल्याची घोषणा केली.
सभेच्या अजेंड्यातील २५० पैकी शंभरहून अधिक विषयांना भाजपा विरोधकांनी विरोध दर्शविला. या संदर्भात नगराध्यक्षांना लेखी विरोधपत्रही सादर करण्यात आले. विशेषतः विषय क्रमांक २८ ते ६९ हे सर्व विषय एकाच प्रभाग क्रमांक दोनशी संबंधित असल्याने भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत ‘लाडका नगरसेवक योजना’ सुरू केली आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला. यानंतर सभागृहात वातावरण तापले व सत्ताधारी–विरोधकांमध्ये ‘तू तू, मैं मैं’ सुरू झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सत्ताधारी गटनेते सचिन चौधरी, मुख्याधिकारी विवेक धांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यालय अधीक्षक डॉ. अजित भट यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले.
४० मिनिटांत सभा आटोपली
सत्तांतरणानंतरची पहिलीच सभा असल्याने सभागृह परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ११.२१ वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विषय क्रमांक १ ते ५ ला सर्वानुमते मंजुरी मिळाली. मात्र विषय क्रमांक ३, ५, १०, १८ व २७ वाचले जात असतानाच भाजपा नगरसेवकांनी त्यांना विरोध करत ते विषय नामंजूर असल्याचे जाहीर केले. प्रभाग क्रमांक दोनमधील विषयांची संख्या अधिक असल्याने गटनेते लोणारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद आणखी तीव्र झाला.
गटनेत्यांकडे विषय द्या, आम्ही मंजुरी देऊ : संतोष चौधरी
सभेत गदारोळ सुरू असताना स्वीकृत नगरसेवक व माजी आमदार संतोष चौधरी यांनी हस्तक्षेप करत, शहराचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास आगामी सभेपूर्वी आपापल्या गटनेत्यांकडे विषय द्यावेत, आम्ही ते मंजूर करू, असे स्पष्ट केले. तसेच शहरातील चायना लाईट काढून दर्जेदार पथदिवे बसवावेत, अशा सूचना त्यांनी बंद पथदिव्यांच्या समस्येवर दिल्या.
आयत्या वेळच्या विषयांना विरोध कायम : लोणारी
गटनेते युवराज लोणारी यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, चांगल्या व जनहिताच्या विषयांना भाजपा पाठिंबा देत आहे व पुढेही देईल. मात्र आयत्या वेळच्या किंवा चुकीच्या विषयांना विरोध राहील. अशा विषयांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील ई-ऑक्शन प्रक्रियेला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. २००८ मध्ये ५७ व्यापाऱ्यांना दुकाने देण्याची सूचना असून, त्यांनाच प्राधान्याने दुकाने मिळावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी मांडली.
पहिल्याच सर्वसाधारण सभेत झालेल्या या गदारोळामुळे पालिकेतील आगामी कारभार आणि राजकीय समीकरणांकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले आहे.
____
नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा लोकशाही मूल्यांना अनुसरून आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. सभेसमोर आलेल्या २५० विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. काही विषयांवर विरोधकांनी असहमती दर्शविली असली तरी लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून नगरपालिकेच्या कायदेशीर चौकटीत, नियमांचे पालन करून व शहरहित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणत्याही प्रभागावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. आयत्यावेळीच्या विषयांमध्ये सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय तसेच नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सभागृहांच्या भाडे निश्चितीबाबतही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रशासन, सत्ताधारी व विरोधक यांच्यात समन्वय ठेवत भुसावळ शहराच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक कारभार करण्याचा आमचा संकल्प आहे.”
गायत्री भंगाळे
लोकनियुक्त नगराध्यक्षा , भुसावळ
____
“नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर तब्बल शंभरहून अधिक विषयांबाबत गंभीर त्रुटी, एकाच प्रभागाला झुकते माप आणि आयत्या वेळचे प्रस्ताव आढळून आले. त्यामुळे भाजप गटातर्फे आम्ही सभेपूर्वीच सुमारे १०० पेक्षा अधिक विषयांवर लेखी हरकत नोंदवली असून ती नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडे दिली आहे. चांगल्या व शहरहिताच्या विषयांना आमचा विरोध नाही; मात्र नियमबाह्य, अन्यायकारक व संशयास्पद विषयांना भाजप कदापि पाठिंबा देणार नाही. लोकशाही पद्धतीने कारभार व्हावा, सर्व प्रभागांना समान न्याय मिळावा, यासाठी आज भाजप गटातर्फे संबंधित विषयांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहोत.
युवराज लोणारी
भाजप गटनेते
____
“नगरपालिकेची ही पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सभेसमोर तब्बल २५० विषय मांडण्यात आले. यापैकी अनेक विषयांना विरोधकांनीही संमती दर्शविली आहे. काही विषयांवर मतभेद असले तरी त्या विषयांवर नगराध्यक्षा आपल्या अधिकारात योग्य तो निर्णय घेतील, याबाबत आमचा विश्वास आहे. आयत्यावेळीच्या विषयांमध्ये सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय तसेच प्रशासनाकडे नुकतेच ताब्यात आलेल्या संतोषी माता पतसंस्थेच्या सभागृहासह नगरपालिकेच्या सर्व सभागृहांच्या भाडे निश्चितीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तळमजल्याच्या सभागृहासाठी १५ हजार तर वरच्या मजल्यासाठी ११ हजार रुपये इतके नाममात्र भाडे निश्चित करण्यात आले असून ही सभागृहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
संतोष चौधरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार तथा नगरसेवक

