Tuesday, March 3, 2026
HomeBlogशेतीच्या नव्या युगाची नांदी ठरणारे बारामती कृषी प्रदर्शन शिंदी येथील युवा शेतकऱ्यांनी...

शेतीच्या नव्या युगाची नांदी ठरणारे बारामती कृषी प्रदर्शन शिंदी येथील युवा शेतकऱ्यांनी घेतला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

गिरीश नेमाडे
भुसावळ : प्रतिनिधी

शेतीच्या भविष्याची दिशा स्पष्टपणे दाखवणारे भव्य कृषी प्रदर्शन १७ ते २४ जानेवारी दरम्यान बारामती येथे पार पडले. सुमारे १७० एकर क्षेत्रावर भरविण्यात आलेले हे प्रदर्शन शेतीशी निगडित आधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि शेतकऱ्यांचा शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे मत शिंदी (ता. भुसावळ) येथील युवा शेतकरी भूषण पुनमसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.
या कृषी प्रदर्शनात केवळ माहितीपर सादरीकरण न करता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची अनोखी संधी शेतकऱ्यांना मिळाली. विशेषतः ए.आय. आधारित सेन्सर, रोबोटिक्स आणि स्मार्ट शेती प्रणालींचा शेतात थेट वापर कसा करता येतो, याची सविस्तर व प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचा मार्ग या प्रदर्शनातून स्पष्टपणे दाखविण्यात आल्याने, हे प्रदर्शन शेतीच्या नव्या युगाची नांदी ठरेल, असा विश्वास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
प्रदर्शनात चिनी मका तंत्रज्ञान, ए.आय. आधारित कांदा व केळी उत्पादन पद्धती, तसेच नेदरलँडमध्ये विकसित ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचा लाल कांदा शेतकऱ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरला. यासोबतच अमेरिका, इस्राइल, इटली, जर्मनी, जपान, कोरिया, फ्रान्स, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधील अत्याधुनिक ए.आय. सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली.
प्रगत शेती यंत्रणा, सूक्ष्म सिंचन प्रणाली, सेन्सरसह सुसज्ज उपकरणे, पॉलिहाऊस, हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, स्मार्ट टूल्स यांची सजीव प्रात्यक्षिके हे प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. तसेच खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्याच्या पद्धती, काढणीपश्चात तंत्रज्ञान, उत्पन्नाचा अंदाज, हवामान बदलानुसार पीक पद्धतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता व मातीची गुणवत्ता याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय रासायनिक खतांचा समतोल वापर, जमिनीत बसविलेले सेन्सर, ड्रोन, रोबोट व सॅटेलाइटच्या सहाय्याने संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन कसे करता येते, याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. नैसर्गिक शेतीतून घेतलेली वालवर्गीय पिके, त्यांचे मांडव उभारणीचे तंत्र, तसेच वांग्याच्या झाडावर कलम केलेले टोमॅटो यांसारख्या नावीन्यपूर्ण प्रयोगांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रदर्शनाला भेट दिलेल्या शिंदी येथील युवा शेतकरी भूषण पुनमसिंग राजपूत, योगेश अशोक पाटील, अमोल चिंधू पाटील आणि दीपक माणिकसिंग राजपूत यांनी पाणी, खत व रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य करता येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. या कृषी प्रदर्शनामुळे शेतीकडे आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि शाश्वत दृष्टीने पाहण्याची नवी ऊर्जा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

होतकरू शेतकऱ्यांना होणार फायदा

गावासह परिसरातील शेती ही कोरडवाहू असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अधिक उत्पन्नाचा प्रत्यक्ष अनुभवातून मार्ग दाखवणाऱ्या या प्रदर्शनास भेट देणे सर्वांनाच शक्य नसले तरी या होतकरू शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. खर्च कमी करून उत्पादन अधिक वाढवण्याचा सल्ला घ्यावा . पारंपारिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

सौ. निलिमा नेमाडे
सामाजिक कार्यकर्त्या, शिंदी ता . भुसावळ .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या