भुसावळ
भुसावळ नगरपरिषदेचे दप्तर थेट संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे शहरातील राजकारण चांगलेच तापले असून, या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरला आहे. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांनी केलेल्या घोषणेनंतर भाजपने याला रुग्णसेवेवर घाला घालणारा निर्णय ठरवत तीव्र विरोध दर्शविला आहे.
नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार आणि दप्तर संत गाडगेबाबा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक व नगरसेविकांनी थेट प्रांत अधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. “संत गाडगेबाबा रुग्णालय वाचवा” या घोषणा देत भाजपने प्रशासनाचा निषेध नोंदविला.
भाजपने या प्रकरणी गंभीर आरोप करत सांगितले की, नगरपरिषदेने या स्थलांतरासंदर्भात कोणताही ठराव मंजूर केलेला नाही, तसेच अधिकृत आदेशही काढलेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारभार राबविला जात आहे. हा निर्णय बेकायदेशीर, मनमानी आणि लोकहिताच्या विरोधात असल्याचे सांगत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना जाब विचारण्यात आला.
उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या दालनात झालेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले होते. भाजपच्या महिला नगरसेविकांनीही प्रचंड आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना थेट सवाल केले. रुग्णालय हे उपचारासाठी असते की कार्यालयीन फाईलींसाठी? असा थेट प्रश्न उपस्थित करत भाजपने प्रशासनाला धारेवर धरले.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी तोंडी आदेश दिल्यानंतर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी तात्काळ अभियंत्यांसह संत गाडगेबाबा रुग्णालयाला भेट दिली. तेथे सुरू असलेले तोडकाम तातडीने थांबविण्यात आले. पुढील निर्णयासाठी मुख्याधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना झाले असून, येत्या काही तासांत याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आंदोलनात भाजपचे गटनेते युवराज लोणारी, उपगटनेते परिक्षित बऱ्हाटे, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे यांच्यासह नगरसेवक पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, पिंटू ठाकूर, किरण कोलते, सुजित भोळे, नितीन धांडे, आशिष पटेल, दीपक धांडे, बबलू बऱ्हाटे, विशाल नाटकर, सोनल महाजन, तसेच नगरसेविका शोभा इंगळे, अनिता सपकाळे, मेघा वाणी, प्रिया चौधरी, प्राची पाटील, छाया देशमुख, आशा पाटील, सोनम इंगळे, अर्चना सातदिवे यांच्यासह डॉक्टर प्रसाद बोंडे, संजय नाहटा, संतोष चौधरी (दाढी) आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत गाडगेबाबा रुग्णालय हे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनरेषा असून, त्याच्या अस्तित्वावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

