यावल : मी ज्या ज्या गावांमध्ये प्रचारासाठी जात आहे, त्या त्या ठिकाणी युवक, माता-भगिनी, तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत असताना, मला प्रकर्षाने जाणवले की, आमच्या मतदारसंघाचा विकास गेल्या पाच वर्षांत हरवून गेला आहे. तो नेमका कुठे गेला, हेच समजत नाही. गेल्यावेळी केलेली चूक या निवडणुकीत दुरुस्त करण्याची जनतेची तयारी आहे, हे स्पष्ट दिसत आहे.आज हरिभाऊ जावळे आपल्यात नाहीत, याचे दुःख आणि खंत आम्हाला आहे. पण आम्ही आपल्याला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, याची हमी देतो. मतदारांनी मला विश्वास दिला आहे की, त्यांच्या विजयाने हरिभाऊंची उणीव भरून निघेल. जनतेच्या या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. याच आधारावर, माझ्या विजयाबद्दल मला कोणतीही शंका उरलेली नाही, असे आत्मविश्वासपूर्ण विचार महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी व्यक्त केले.
आज अमोल जावळे यांनी सांगवी, अट्रावल, भोरटेक, वनोली, कोसगाव, पिळोदा, म्हैसवाडी आदी भागात भेटी देत मतदारांशी संवाद साधला आणि विजयासाठी समर्थन मागितले. या संवादादरम्यान, अमोल जावळे म्हणाले, “माझा उद्देश केवळ राजकारण करणे नाही, तर 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण ही माझ्या कामाची भूमिका असेल. समाजातील उपेक्षित, वंचित आणि विकासापासून दूर असलेल्या घटकांचा विकास हेच माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल.” ते पुढे म्हणाले, “मला विकासाचे स्पष्ट व्हिजन राबवायचे आहे. जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय आणि राज्यात पुन्हा येणारे महायुतीचे सरकार यामुळे रावेर मतदारसंघात येत्या पाच वर्षांत विकासाची गंगा वाहणार आहे. माझ्याकडे कामासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान होणे, यातच मी माझ्या जीवनाचे सार्थक मानतो.” मतदारांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे अमोल जावळे यांनी मतदारांचे आभार मानत त्यांच्याशी दृढ नाते प्रस्थापित करण्याचा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, उमेश पाटील, सविता भालेराव, जयश्री चौधरी, पुरोजित चौधरी, सागर कोळी, योगराज बऱ्हाटे, शाम महाजन, भरत पाटील, राकेश फेगडे, नितीन चौधरी, किरण महाजन, हरीश चौधरी, हरीश कोळी, हरीश कोळी यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.