Sunday, December 22, 2024
HomeBlogआमदार आमोल जावळेंची भुमि अभिलेख कार्यालयास अचानक भेट. अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ,...

आमदार आमोल जावळेंची भुमि अभिलेख कार्यालयास अचानक भेट. अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या

प्रतिनिधी I यावल

रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांनी आज अचानक यावल भुमि अभिलेख कार्यालयाला भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांची सविस्तर माहिती घेतली. भेटीदरम्यान, मोजनीसाठी नोटीस पाठवलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बामणोद येथील शेतकरी वासुदेव चौधरी यांनी नोटीस उशिरा मिळाल्यामुळे मोजनी ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्याचे सांगितले. या कारणामुळे मोजनी रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या समस्येवर आमदार अमोल जावळे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश भूमी अभिलेख अधिकारी विजयसिंग पाटील यांना दिले. प्रलंबित प्रकरणांची सविस्तर यादी मागवून त्यांचा आढावा घेतला आणि अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. तसेच, ऑनलाईन कामकाजाची प्रगती आणि कार्यक्षमता तपासून, कामे सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजनांवर चर्चा केली.

आमदार अमोल जावळे यांच्या या अनपेक्षित भेटीने कार्यालयातील अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. प्रलंबित प्रकरणे, ऑनलाईन प्रणालीची प्रगती आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवेची सखोल माहिती देण्यात अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. यावेळी आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सजग राहण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती हर्षल पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपुत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या