प्रतिनिधी l भुसावळ
“आपल्याकडे काय नाही यावर विचार करून कमीपणा वाटून घेऊ नका, तर न्यूनगंड दूर करा आणि मोठी स्वप्न पाहायला शिका. ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि परिस्थितीला दोष देण्याऐवजी तिच्यावर मात करण्याची जिद्द ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करा. आव्हानांना संधी मानून त्यांचा सकारात्मकतेने सामना करा”, असा सल्ला व्याख्याते डॉ. जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे आज दि. २१ रोजी राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे ( पानाचे ) ता.भुसावळ येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे तृतीय पुष्प जळगाव येथील डॉ. जयदीप पाटील यांनी गुंफले. ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ या विषयावर ते बोलत होते. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन एकनाथ बडगुजर, मुख्यध्यापक एस.पी.चौधरी, एल.पी.पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ.संजू भटकर, सहसमन्वयक प्रा.डॉ.शाम दुसाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख डॉ.संजू भटकर यांनी अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली. माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून दरवर्षी पुष्पांजली प्रबोधन मालेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुस्तकांचा नाद ज्याला लागतो, तो स्वतःचा अंतर्नाद ओळखतो. मनाचा अंतर्नाद ओळखणारा माणूस स्वतःला घडवायला लागतो. अशा माणसाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते आणि तो यशस्वी होण्यासाठी मेहनत करतो. अंतर्नाद ओळखल्यावर तो माणूस मातीतला मोती होतो आणि त्याचा प्रवास यशाकडे सुरू होतो.”, असाही सल्ला डॉ. जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रेरणादायक गोष्टींच्या माध्यमातून डॉ. जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. अब्दुल कलाम, मार्क झुकेरबर्ग, अब्राहम लिंकन, डॉ. रघुनाथ माशेलकर यांसारख्या महान व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा सांगत त्यांनी मार्गदर्शन केले. या गोष्टींनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी नवी दिशा दाखवली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि आत्मविश्वास वाढवला.
प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन योगेश गांधेले यांनी केले तर आभार प्रा.डॉ. श्याम दुसाने यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य ग.स. सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, अमित चौधरी, कुंदन वायकोळे, मंगेश भावे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.