रावेर I यावल
रावेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या उद्याच्या मतदानापूर्वी मतदारांना आपल्या हक्काचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. “मला विजयाचा शंभर टक्के विश्वास आहे,” असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आज, मतदानाच्या आदल्या दिवशी, अमोल जावळे सकाळी लवकरच उठले आणि कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. “निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे, तो शांततेत साजरा करावा,” असे आवर्जून सांगत त्यांनी वाद-विवाद किंवा भांडणांना दूर ठेवण्याचे निर्देश दिले.
मतदारसंघाच्या विकासासाठी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्वप्नांना नवीन दिशा देण्याचा दृढ संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. “मतदारसंघातील लोकांनी मला नेहमीच प्रेम आणि सहकार्य दिले आहे. याच प्रेमाचा आणि विश्वासाचा आशीर्वाद मला मतदानाच्या रूपाने मिळेल,” असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला.
मतदारांनी आपल्याला विजयी केल्यास मतदारसंघाचा विकास त्यांच्या वडिलांच्या स्वप्नांनुसार तसेच स्वतःच्या नव्या दृष्टिकोनातून करण्याचे वचन जावळे यांनी दिले. “मतदारसंघाच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी माझे सर्व प्रयत्न असतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.