Tuesday, March 3, 2026
Homeब्रेकिंगहरविलेल्या बालपणाचा शोध राज्यात वाढलेल्या बालबेपत्ता प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात ‘ऑपरेशन मुस्कान’

हरविलेल्या बालपणाचा शोध राज्यात वाढलेल्या बालबेपत्ता प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात ‘ऑपरेशन मुस्कान’

भुसावळ : प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मुले बेपत्ता झाल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या चिंताजनक पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असलेल्या भुसावळसारख्या शहरांमध्ये विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे ‘ऑपरेशन मुस्कान’ ही हरविलेल्या, बेघर अवस्थेत आढळणाऱ्या तसेच बालमजुरीत अडकलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि शहरातील गर्दीच्या भागांमध्ये हरविलेली मुले आढळण्याची शक्यता अधिक असते. यामुळेच भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, स्थानक परिसर, शाळांच्या सभोवतालचा भाग, प्रमुख चौफुल्या तसेच इतर गर्दीची ठिकाणे येथे पोलिसांकडून बारकाईने पाहणी केली जात आहे. या ठिकाणी एकटी आढळणारी लहान मुले, संशयास्पद परिस्थितीत वावरणारी बालके यांच्याशी संवाद साधून त्यांची ओळख व घरची माहिती जाणून घेतली जात आहे.

मोहीमेदरम्यान बालकांकडून प्रेमाने चौकशी करताना कोणी त्यांना कामाला लावले आहे काय, बालमजुरी करून घेतली जात आहे काय, अथवा ते कुठून आणि कशा परिस्थितीत येथे आले आहेत, याची माहिती घेतली जात आहे. गरज भासल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, बालकांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. ही कारवाई केवळ कायद्यापुरती मर्यादित नसून, हरविलेल्या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचविणे हा या मोहिमेचा खरा उद्देश आहे.

दि. ४ फेब्रुवारी २०२६ पासून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम सातत्याने सुरू आहे. मध्य रेल्वेच्या मोठ्या जंक्शनमुळे भुसावळ शहर हे अनेक जिल्हे व राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने येथे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. भविष्यातही अशा मोहिमा अधिक तीव्र स्वरूपात राबवून एकही बालक दुर्लक्षित राहू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी ओळखून आपल्या परिसरात कोणीही बेवारस, हरविलेले किंवा संशयास्पद अवस्थेत असलेले बालक आढळून आल्यास तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ०२५८२/२२२३९९ किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये सुरू असून, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात विशेष पथक कार्यरत आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक भारती काळे, पोहेकॉ नितीन सपकाळे, पोहेकॉ भाऊसाहेब पाटील, महिला पोहेकॉ सीमा चौधरी व महिला पोकॉ प्रियंका भोसले यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या