Saturday, May 30, 2026
Homeभुसावळजीवन क्षणभंगुर; नामस्मरणातूनच खरा लाभ – ह.भ.प. संजय महाराज यांचे प्रभावी निरूपण

जीवन क्षणभंगुर; नामस्मरणातूनच खरा लाभ – ह.भ.प. संजय महाराज यांचे प्रभावी निरूपण

भुसावळ / प्रतिनिधी

काशिराम नगर, खळवाडी येथे सुरू असलेल्या ‘श्रीमद् भागवत कथा व अखंड नामसंकीर्तन सप्ताहा’त ह.भ.प. संजय महाराज (बामणोद) यांनी जीवनाच्या क्षणभंगुरतेवर भाष्य करताना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. मानवी जीवन अत्यंत अनिश्चित असून, मृत्यूची कोणतीही हमी नसल्याने प्रत्येकाने सजग राहून अध्यात्माकडे वळावे, असे त्यांनी सांगितले.

मानव जन्म घेतो आणि रिकाम्या हातानेच जातो, त्यामुळे आयुष्यात काय कमावले याचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ खाणे-पिणे, झोपणे यापुरतेच जीवन मर्यादित ठेवू नये, तर आत्मकल्याणासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जीवन पाण्यावरील बुडबुड्यासारखे असून तो कधी फुटेल याची खात्री नसते, त्याप्रमाणे मानवी देहही नश्वर असल्याचे त्यांनी उदाहरणाद्वारे सांगितले.

सप्ताहातील कथा-कीर्तन हे केवळ ऐकण्यापुरते न ठेवता ते मनन व चिंतन करून जीवनात उतरवणे आवश्यक आहे. कथा ऐकताना मन विचलित न होता एकाग्रचित्ताने श्रवण करावे, अन्यथा त्याचा खरा लाभ मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

महाराजांनी सांगितले की, देवळात शरीर असले तरी मन इतरत्र भटकत असेल तर भक्ती निष्फळ ठरते. त्यामुळे नामस्मरण करताना पूर्ण एकाग्रता आवश्यक आहे. संत परंपरेनुसार कीर्तन व कथेमुळे अंतःकरणात श्रीहरीची मूर्ती दृढ व्हावी, हाच त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रवचनातून उपस्थित भाविकांना आत्मपरीक्षणाचा संदेश मिळाला असून, उर्वरित दिवसांमध्येही भक्तांनी सातत्याने नामस्मरण व चिंतन करावे, असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या