Wednesday, May 6, 2026
Homeभुसावळबसस्थानकात ‘हातचलाखी’चा पर्दाफाश; सोन्याची पोत चोरी उघड, महिला आरोपी जेरबंद भुसावळ...

बसस्थानकात ‘हातचलाखी’चा पर्दाफाश; सोन्याची पोत चोरी उघड, महिला आरोपी जेरबंद भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची कारवाई

भुसावळ / प्रतिनिधी

गर्दीच्या बसस्थानकात हातचलाखीने पर्समधील सोन्याची पोत लंपास करणाऱ्या महिलेचा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने शिताफीने पर्दाफाश करत तिला अटक केली. आरोपीकडून ३,२०,००० रुपये किंमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये निर्माण झालेली भीती दूर झाली आहे.

या प्रकरणी दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कुसुम देविदास चौधरी (वय ६२, रा. शिवराय नगर, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते ८.३० वाजेदरम्यान भुसावळ बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार डी.बी. पथकाने तपासाला गती दिली. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा. यावल) हिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण पोत जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईत डी.बी. पथकातील पोहेकॉ विजय नेरकर , कांतीलाल केदारे , सचिन चौधरी , महेंद्र पाटील , अक्षय कोतकर , योगेश माळी , चंद्रकांत रायपुरकर , जावेद शहा, भुषण चौधरी , अमर अढाडे , दिलीप कोल्हे , जीवन कापडे , हर्षल महाजन, महिला पोलीस कर्मचारी शिल्पा राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कांतीलाल केदारे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या