भुसावळ / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यासह भुसावळ तालुक्यात सध्या रस्ता रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. भुसावळ-जामनेर व नशिराबाद-बोदवड हे दोन प्रमुख राज्यमार्ग रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. विकासाच्या दृष्टीने ही कामे स्वागतार्ह असली तरी, या रुंदीकरणामुळे नवीन व गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
विहिरी आल्या रस्त्याच्या उंबरठ्यावर
रस्ता रुंदीकरणामुळे बहुसंख्य ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी थेट रस्त्याच्या कडेला आल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता व विहिरीच्या काठामध्ये केवळ दोन-तीन फुटांचे अंतर उरले आहे. भुसावळ-जामनेर मार्गावरील चोरवड गावाशेजारी अशीच एक मोठी विहीर रस्त्यालगत उघडी पडली आहे. या मार्गावर रात्री-अपरात्री वाहने सुसाट वेगाने धावतात. पावसाळ्यात किंवा धुक्याच्या काळात दृश्यमानता कमी झाल्यास कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
भूतकाळातील विदारक घटना
या धोक्याची गंभीरता मागील दोन घटनांवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्ये नांदुऱ्याजवळील वडनेर भोलजी गावाशेजारी* विश्वगंगा नदीजवळील एका उघड्या विहिरीत भरधाव कार कोसळली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.
त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. या दोन्ही घटनांमधील समान दुवा म्हणजे रस्ता रुंदीकरणामुळे विहिरी रस्त्याशेजारी येणे आणि त्या ठिकाणी कोणताही भराव, उंच कठडा अथवा संरक्षक भिंत नसणे.
या उघड्या विहिरी केवळ चारचाकी वाहनांनाच नव्हे, तर दुचाकीस्वार, पायी जाणारे विद्यार्थी, शाळकरी मुले, शेतात जाणारी गुरेढोरे, बैलगाडी यांनाही धोकादायक ठरत आहेत. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे किंवा मोठ्या ट्रकच्या दाबामुळे दुचाकी व पादचारी अडचणीत येऊन थेट विहिरीत पडू शकतात.
रस्ता सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, रुंदीकरणाच्या कामात ‘रोड सेफ्टी ऑडिट’ बंधनकारक आहे. ज्या-ज्या ठिकाणी विहिरी, नाले, खोलगट भाग रस्त्याच्या ५ मीटर परिसरात येत असतील, तेथे किमान १.२ मीटर उंचीचे RCC कठडे, क्रॅश बॅरियर किंवा दगडी संरक्षक भिंती उभारणे आवश्यक आहे. तसेच रात्री दिसतील असे रिफ्लेक्टर, धोक्याचे फलक व सौर पथदिवे बसवावेत.
“रस्ते विकासाबरोबरच मानवी जीवनाची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची आहे. एका अपघाताने अनेक कुटुंबे उध्वस्त होतात. त्यामुळे डांबरीकरण पूर्ण होण्याआधीच सुरक्षेचे उपाय करा. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आजच सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणे शोधावीत व पर्यायी व्यवस्था तातडीने निर्माण करावी,” अशी मागणी चोरवड परिसरातून होत आहे.
_______
धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तातडीने पर्यायी सुरक्षा व्यवस्था उभी करावी
रस्ते विकासाची कामे करताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणी शेतातील विहिरी थेट रस्त्याच्या कडेला आल्या आहेत. अघटित घटना टाळण्यासाठी अशा सर्व विहिरींना उंच व मजबूत संरक्षक कठडे बसवावेत, तसेच रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंती व क्रॅश बॅरियर उभारावेत. रात्रीच्या वेळी धोक्याची सूचना मिळण्यासाठी रिफ्लेक्टर व धोक्याचे फलक लावणेही आवश्यक आहे. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आजच धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तातडीने पर्यायी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी.
–निलिमा गिरीश नेमाडे
सामाजिक कार्यकर्त्या, शिंदी, ता. भुसावळ

