Monday, March 2, 2026
Homeभुसावळगणतंत्र दिनालाही राजकारणाची छाया भुसावळ नगरपरिषदेत ध्वजारोहणावरून वाद भाजप गटनेते युवराज लोणारी...

गणतंत्र दिनालाही राजकारणाची छाया भुसावळ नगरपरिषदेत ध्वजारोहणावरून वाद भाजप गटनेते युवराज लोणारी यांचा परंपरा मोडल्याचा आरोप

भुसावळ

देशभरात २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात गणतंत्र दिन साजरा केला जात असताना, भुसावळ नगरपरिषदेत मात्र या राष्ट्रीय सणालाही राजकारणाची छाया पडल्याचे चित्र समोर आले आहे. ध्वजारोहणाच्या अधिकारावरून निर्माण झालेल्या वादामुळे नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापले असून, या संदर्भात भाजपाचे गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रक प्रसिद्ध करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भुसावळ नगरपरिषदेच्या इतिहासात गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाची एक निश्चित व परंपरागत पद्धत राबवली जात होती. या परंपरेनुसार नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयात नगराध्यक्ष, पाणीपुरवठा व जलनिस्सारण केंद्रात संबंधित सभापती, नगरपरिषद दवाखान्यात आरोग्य समिती सभापती तसेच नगरपरिषद संचलित दु-शि विद्यालय व म्युनिसिपल हायस्कूल येथे शिक्षण सभापती व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात होते.

मात्र यंदा नगराध्यक्ष गायत्री भंगाळे – गौर यांनी ही दीर्घकालीन परंपरा डावलत दु-शि विद्यालय व म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे आदेश काढल्याने वादाला तोंड फुटले आहे. गणतंत्र दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशीही अधिकारांची कुरघोडी व राजकीय हस्तक्षेप करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाच्या पत्रकात करण्यात आला आहे.

परंपरेचा सन्मान न करता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याने नगराध्यक्षांनी लहान मनोवृत्तीचे दर्शन घडवले असल्याची टीका करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या सल्ल्यांमुळेच असे आदेश काढण्यात आल्याचा आरोप करत, सभापतींना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याच्या निर्णयाचा निषेधही पत्रकाद्वारे नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, देशप्रेम आणि राष्ट्रीय सणाचे महत्त्व लक्षात घेता राजकीय मतभेद बाजूला ठेवून नगरपरिषदेच्या नियोजित सर्वच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना सर्व भाजपा नगरसेवक उपस्थित राहणार असल्याचे भाजपाचे गटनेते युवराज लोणारी यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकारामुळे नगरपरिषदेत अनावश्यक वाद निर्माण झाला असून, राष्ट्रीय सणाच्या दिवशी सुसंवाद आणि परंपरेचा सन्मान अपेक्षित असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या