भुसावळ : प्रतिनिधी
भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भुसावळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वज फडकावण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
यावेळी नायब तहसीलदार शोभा घुले, रोशना रेवतकर, प्रिती लुटे, जितेंद्र पाडवी, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, नगरसेवक संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक राहुल वाघ (बाजारपेठ पोलीस ठाणे) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रगीतांच्या सामूहिक गायनामुळे वातावरण देशभक्तीमय झाले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, अनुशासन आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रकर्षाने दिसून आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रशासन, नागरिक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत संविधान व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

