भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील साकरी गावावर मंगळवार, २७ जानेवारी रोजी सकाळी एक काळी छाया पसरली. नववीत शिक्षण घेणाऱ्या दोन निष्पाप, अल्पवयीन जीवलग मैत्रिणींना गावातीलच तरुणाने विहिरीत ढकलून ठार मारल्याची संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. लक्ष्मी अभय महाजन (१५, रा. गायत्री मंदिराजवळ, साकरी) व नवव्या विजय चौधरी (१५, रा. विठ्ठल मंदिराजवळ, साकरी) अशी या दुर्दैवी मुलींची नावे आहेत. या अमानुष घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला असून साकरी गावात शोक, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन्ही मैत्रिणी नेहमीप्रमाणे ट्यूशनसाठी घरातून निघाल्या. मात्र त्या ट्यूशनला पोहोचल्याच नाहीत. सकाळी साडेनऊच्या सुमारास गावापासून काही अंतरावरील सोपान फेगडे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर दोन्ही विद्यार्थिनींची दप्तरे आढळून आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या दृश्यानंतर शोधकार्य सुरू झाले. पोहणाऱ्यांच्या मदतीने दुपारी बारा वाजता एका तरुणीचा आणि दुपारी एक वाजता दुसऱ्या तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. निष्पाप चेहऱ्यांवरील शांतता पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला; गाव अक्षरशः सुन्न झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोहेकॉ. उमाकांत पाटील प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार आदींनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात गावातील एका तरुणाच्या दुचाकीवरून दोन्ही मुली गावाबाहेर जात असल्याचे स्पष्ट दिसताच संशयाची सुई त्याच्याकडे वळली. संबंधित तरुणासह आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने दोन्ही मुलींना विहिरीत ढकलल्याचा दावा केला जात असून ही घटना नेमकी का आणि कशी घडली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. “आधी आरोपी आमच्या ताब्यात द्या, मगच मृतदेह हलवा,” अशी आक्रमक भूमिका घेत हजारो ग्रामस्थांनी विहिरीजवळ ठिय्या दिला. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या या जमावाने न्यायासाठी जोरदार घोषणा दिल्या. आरोपींना ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसेंच्या वाहनासमोरही जमावाने ठाम भूमिका घेतली. जमावाच्या दबावामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यास सायंकाळचे साडेपाच वाजले.
संतप्त जमावाकडून संशयित आरोपींची घरे पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला . परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक पाचारण करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी उपअधीक्षक नितीन गणापुरे, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.
माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आमदार खडसेंनी संतप्त जमावाला शांतता राखण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली.
दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या घटनेने साकरी गावाच्या मनात भीती, संताप आणि प्रश्नांचा भडका उडवला आहे. “आमच्या मुली सुरक्षित आहेत का?” हा सवाल प्रत्येक पालकाच्या डोळ्यांत दिसत आहे. सध्या साकरीत तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण गाव न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

