Tuesday, March 3, 2026
Homeभुसावळभुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवक राज विजय चौधरी यांचा पाठपुरावा; पाणीपुरवठा, स्मारक,...

भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवक राज विजय चौधरी यांचा पाठपुरावा; पाणीपुरवठा, स्मारक, घरकुल व नागरी सुविधांसाठी पालिकेकडे साकडे

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ शहरातील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, सांस्कृतिक जतन व गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरसेवक राज विजय चौधरी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत नगरपालिकेकडे विविध महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक २० सहित विविध भागांतील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे व प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांना स्वतंत्र अर्ज सादर केले आहेत.

प्रभाग क्रमांक २० मध्ये अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, याठिकाणी १० नवीन बोअरिंग घेणे तसेच जुन्या विहिरींची साफसफाई करून सबमर्सिबल मोटार व पाईप फिटिंगची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर, भुसावळ शहरातील वैकुंठवासी ह.भ.प. एकनाथ महाराज यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या स्मारकासह भव्य गार्डन विकसित करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांसाठी विरंगुळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांत बसण्याची सुविधा तसेच शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

घरकुल योजनांबाबतही नगरसेवक चौधरी यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या झोपडीनिवासी व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना नियमित घरकुल मिळावे यासाठी प्रभागातील पात्र लाभार्थ्यांची नावे शासनाकडे पाठवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंचशील नगर, गौतम नगर, गंगाराम परिसर आदी भागांतील नागरिकांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

तसेच प्रभागातील घरकुल योजनांची सद्यस्थिती तपासून लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा, अशीही ठोस मागणी करण्यात आली आहे. शहरातील विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नगरसेवक राज विजय चौधरी यांच्या या मागण्यांमुळे भुसावळ शहराच्या मूलभूत सुविधा, सांस्कृतिक विकास व सामाजिक कल्याणाला चालना मिळणार असून, येत्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या