भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील काशीरामनगर येथील कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात सोमवार, दि. ९ फेब्रुवारीपासून संगीतमय श्री रामायण कथेचा भक्तिभावाने प्रारंभ झाला. धर्म, संस्कृती व भक्तीचा जागर करणाऱ्या या सात दिवसीय धार्मिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिव–पार्वती विवाह प्रसंग सादर करण्यात आला. या पवित्र प्रसंगाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
जय बजरंग मंडळ, काशीराम नगर, भुसावळ यांच्या आयोजनाने सुरू झालेल्या या धार्मिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगीतमय रामायण कथेचे कथावाचक ह.भ.प. दत्तात्रेय महाराज साकरीकर त्यांच्या ओघवत्या व मधुर वाणीतून साकार झालेल्या शिव–पार्वती विवाह प्रसंगाने भाविकांच्या मनात भक्तिरस जागविला. भगवान शंकर व माता पार्वती यांच्या विवाहाचे वर्णन ऐकताना उपस्थित भाविक भारावून गेले, अनेकांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू तर चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
दि. ९ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या संगीतमय श्री रामायण कथेमध्ये विविध दिवसांमध्ये नामवंत कथावाचकांच्या वाणीतून रामायणातील विविध प्रसंग उलगडले जाणार आहेत. कथेमध्ये रामजन्म, सीतास्वयंवर, वनवास, हनुमान चरित्र, लंका दहन, राम-रावण युद्ध व रामराज्याभिषेक असे प्रसंग संगीतमय शैलीत सादर होणार आहेत.
कथेसोबतच दररोज संगीत, अभंग, भजन, किर्तन यामुळे संगीतमय श्री रामायण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धा, संस्कार आणि भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारा एक भावनिक सोहळा ठरत आहे.
या भक्तीमय उपक्रमासाठी विशाल मंडळ, आझाद कॉलनी, बेरीगाव नगर; सर्व मित्र मंडळ, श्रीराम मंडळ, प्रसाद मंडळ तसेच इतर मित्र मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्म यांचा संगम असलेल्या या संगीतमय श्री रामायण कथेचा लाभ भुसावळ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने घेत असून, कुटुंबासह उपस्थित राहून या भक्तिरसाचा आस्वाद घ्यावा, असे आयोजक जय बजरंग मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

