Wednesday, May 6, 2026
Homeभुसावळभुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी–विरोधकांनी एकत्र येण्याची गरज : उमेश नेमाडे आरोप-प्रत्यारोपांना विराम...

भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी–विरोधकांनी एकत्र येण्याची गरज : उमेश नेमाडे आरोप-प्रत्यारोपांना विराम देत मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

भुसावळ / प्रतिनिधी

नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमधील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. करदाता नागरिक म्हणून पुढे येत त्यांनी संयम राखून विकासाभिमुख भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली.

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना नेमाडे यांनी स्पष्ट केले की, हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे विचाराधीन आहे. समितीचा निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नसून यामुळे शहरातील वातावरण दूषित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

नेमाडे यांनी सांगितले की, सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय वादांमध्ये वेळ घालवण्याऐवजी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शहरातील अनेक भागांत १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून नागरिकांना तीव्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करून नियोजित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

कचरा व्यवस्थापनाच्या समस्येकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, कचराकुंड्यांमधील कचरा वेळेवर न उचलल्याने मोकाट कुत्र्यांमुळे तो रस्त्यावर पसरत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असूनही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामातील कुचराईबद्दल शिस्तभंगाची कारवाई व आवश्यक असल्यास निलंबनाची कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नगराध्यक्षांकडे यासंदर्भातील अधिकार असून त्यांनी त्यांचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी “दोन पावले मागे” घेऊन एकत्र काम करावे, असे आवाहन करत नेमाडे यांनी आपत्कालीन प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या समितीत तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचा सहभाग असावा, तसेच आमदार तथा मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी मिळवून कामांना गती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अनुभवाचाही उपयोग करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

नगरपालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद चर्चा न होता गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवेदन स्वीकारणे व त्यावर योग्य ती कारवाई करणे हा नगराध्यक्षांचा अधिकार असून प्रशासनानेही आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. गरज भासल्यास कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याची सूचनाही त्यांनी नगराध्यक्षांना केली.

भुसावळ हे सर्वधर्मीय व सर्वजातीय लोकांचे “मिनी भारत” असल्याचे सांगत शहरातील सामाजिक ऐक्य अबाधित राखण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत व उत्साहात पार पडल्याचा उल्लेख करत त्यांनी राजकीय नेत्यांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शेवटी, “जनतेला वाद नकोत, तर सुविधा हव्यात. नागरिकांची पिळवणूक थांबवून विकासाला प्राधान्य द्यावे,” असे ठाम मत व्यक्त करत, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी शक्यता व्यक्त करून त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना इशाराही दिला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या