भुसावळ / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे स्वागत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या सात गुन्ह्यांचा उलगडा करून दणक्यात केले आहे. डी.बी. पथकाने केलेल्या धडक कारवाईत चोरीच्या ७ मोटरसायकलींसह दोघांना जेरबंद करण्यात आले असून, एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी आशीष विनायक झोपे (वय ३६, रा. तापी नगर) यांची होंडा शाईन मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार दि. २२/०४/२०२३ रोजी दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने डी.बी. पथकाला सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले.
पथकाने रविंद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. कोळीवाडा, नेरी दिगर, ता. जामनेर) याच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली. दोघांकडून सखोल चौकशीअंती एकूण ७ मोटरसायकली हस्तगत* करण्यात आल्या.
या टोळीने केवळ भुसावळच नव्हे तर जामनेर, जळगाव एमआयडीसी, नांदुरा व धुळे परिसरातही चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये होंडा शाईन, बजाज पल्सर १२५, १५०, १३५ व सुझुकी बर्गमन अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, राहुल वाघ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. डी.बी. पथकातील पो.उप.निरी. मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, राहुल वानखेडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. याबाबत पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहेत.

